kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आधी भरधाव वेगाने वाहन चालवत अनेकांना धडक दिली , नंतर माफी मागितली ; बघा वडोदरा प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं ??

गुजरातमधील वडोदरा येथे नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. रक्षित चौरसिया या २३ वर्षीय मुलाने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेकांना धडक दिली. या घटनेमध्ये एका महिलेने जीव गमावला असून ७ जण जखमी झाले आहेत. या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे हा व्हिडीओ आणि आत्तापर्यंत काय काय घडलं आहे जाणून घेऊयात.

व्हिडीओत काय आहे ?

घडलेल्या घटनेनंतर आरोपी वाहनातून बाहेर येऊन मोठमोठ्याने ओरडत असताना दिसून येत आहे. अनदर राऊंड, अनदर राऊंड… असे ओरडत असताना त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओत आरोपी ओम नमः शिवाय म्हणत असल्याचे दिसून येत आहे.

यानंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. आज पोलिसांनी आरोपी रक्षित चौरसियाला घटनास्थळी आणून प्रत्यक्ष पाहणी केली असता रक्षितला स्वतःच्या पायावर चालताही येत नव्हते. दोन जणांनी त्याला पकडून अक्षरशः उचलून आणले. तसेच पुन्हा पोलीस वाहनात बसवत असताना रक्षित दोन्ही हात कानाला धरून माफी मागताना दिसला.

आरोपीचे म्हणणे काय ?

दरम्यान आज सकाळी आरोपीने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना वाहन चालविताना आपण मद्य घेतले नसल्याचे म्हटले. तसेच वाहनाचा वेगही ताशी ५० किमी होता, असा दावा त्याने केला. तसेच खड्ड्यांमुळे अपघात झाला आणि नंतर एअरबॅग उघडली गेल्यामुळे पुढचे काही दिसले नाही, असा दावाही केला. आम्ही होळी पाहण्यासाठी गेलो होतो, तिथे कोणतीही पार्टी झाली नाही, असेही आरोपीने सांगितले.

पोलिसांचे म्हणणे काय ?

वडोदरा पोलीस आयुक्त नरसिंह कोमर यांनी सांगितले की, या धडकेत तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. मोटर वाहन कायद्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फॉरेन्सिक टिमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. याआधारे आम्ही आरोपीविरोधात मोटर वाहन कायद्या व्यतिरिक्त निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी रक्षित चौरसिया वाहन चालवत असताना त्याच्याबरोबर गाडीत प्रांशू चौहान नावाचा आणखी एक तरूण बसला होता. अपघात घडला तेव्हा दोन्ही तरूणांनी मद्य किंवा इतर अंमली पदार्थाचे सेवन केले होते का? हे तपासण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी काम करत आहोत.