Breaking News

संभलमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू ; जाणून घ्या काय काय घडलं

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शाही जामा मशिदीचा सर्व्हे करत असताना हा हिंसाचार झाला होता. संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून तिथे मोठ्या संख्येनं सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं आहे. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत या परिसरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

का झाला हिंसाचार?

मृत पावणाऱ्यांची संख्या चारहून अधिक असल्याची शंका व्यक्त केली जाते आहे. त्या शंकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे.

मुरादाबादचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनिराज यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “असं अजिबात नाही. काल आम्ही तीन मृतदेहांचं शवविच्छेदन केलं होतं. तिन्ही मृतदेहांना दफन करण्यात आलं आहे. मुरादाबादमध्ये उपचार करत असताना आजच एकाचा मृत्यू झाला आहे.”

“आतापर्यंत त्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालेलं नाही. या मृत्यूमागचं कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच समोर येऊ शकेल. पाचव्या मृत्यूबद्दल कोणतीही खातरजमा झालेली नाही.”

संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) कृष्ण कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की संभल मध्ये दगडफेकीच्या घटनेसंदर्भात जवळपास 2500 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की दगडफेक करणाऱ्या सर्वजणांची ओळख सीसीटीव्हीद्वारे पटवली जाणार असून सर्वांनाच तुरुंगात पाठवलं जाईल.

कधी झाला हिंसाचार ?

रविवारी संतप्त जमावानं अनेक गाड्यांना आग लावल्यानंतर या हिंसाचाराची सुरूवात झाली होती. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडले तसंच लाठीमार देखील केला होता.

मुरादाबाद चे विभागीय आयुक्त आंजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वाजता सर्व्हे करून झाल्यानंतर जेव्हा सर्व्हे करणारी टीम निघाली तेव्हा जमावानं त्यांच्यावर तिन्ही बाजूंनी दगडफेक केली. यानंतर सर्व्हे करणाऱ्या टीमला सुरक्षितपणे तिथून निघता यावं यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

त्यांनी सांगितलं की या दरम्यान तिन्ही बाजूंनी जमाव आमने-सामने आला होता. त्याचवेळेस गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात पोलीस अधीक्षकांच्या पीआरओच्या पायाला गोळी लागली तर उप जिल्हाधिकाऱ्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. तसंच 15-20 पोलीस जवान देखील जखमी झाले.

संभलचे समाजवादी पार्टीचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांनी हिंसाचार आणि गोळीबारासंदर्भात बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांना सांगितलं की पोलिसांनी गोळीबार केला आणि शहरात तणावाचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *