सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे शनिवारी आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती उत्सवांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा विराजमान होणार असल्याने शुक्रवारी दिवसभर महानगरांमधील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत बाप्पांचे रात्री उशिरापर्यंत मंडळात आगमन झाले.
- श्रीगणेश व्रत प्रतिष्ठापना पूजन शनिवारी (दि. ७) पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत, तसेच मुख्य चतुर्थी तिथी महत्त्वाची म्हणून सायंकाळपर्यंत करता येणार आहे.
- ‘दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या माहितीनुसार, शनिवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना करता येईल.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मध्यान्हनंतरदेखील करता येऊ शकते.
यंदा गणेश चतुर्थी दि. ७ सप्टेंबरला असून, अनंत चतुदर्शी दि. १७ सप्टेंबरला आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अकरा दिवस साजरा करता येणार आहे. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विशिष्ट करण (भद्रा) तसेच राहुकाल, आदी वर्ज्य नाही. शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची गरज नाही.