लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. राज्यभर नव्हे, देशभर नव्हे तर संपूर्ण जगात लाडक्या बाप्पांसाठी तयारी चालू आहे. अशातच पुणे महापालिकेने देखील जय्यत तयारी केली आहे. पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी आपल्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधीव हौद आणि २६५ ठिकाणी ठेवलेल्या ५६८ लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्रोतात मूर्तींचे विसर्जन न करता अधिकाधिक प्रमाणात मूर्ती दान करावे, यासाठी महापालिकेतर्फे क्षेत्रीय कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २५६ ठिकाणी निर्माल्य कलश-कंटेनर ठेवण्यात आले आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये इकोएक्झिस्ट संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून तिचा पुनर्वापर केला जाणार आहे. मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्याने नदीपात्रात गाळ साठतो. त्याने जलसृष्टीवर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुनर्वापर केल्यास मूर्तिकारांना मूर्ती अथवा माती परत देऊन त्यांना मदत होते. या पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

तर, निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.