Breaking News

आर्थिक

सुयोग्य आर्थिक नियोजन प्रक्रियेचा अभाव आणि आम्ही….

मागच्या आठवड्यात अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे सेल झाला.. तब्बल ९.८ बिलियन डॉलर्सची अमेरिकन बाजार पेठेमध्ये उलाढाल झाली… थोडक्यात काय तर आर्थिक महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशात शटडाऊनची स्थिती, बेरोजगारी, वाढती महागाई याची पूर्णपणे कल्पना असणारा सामान्य नागरिक देखील या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात या काळात खरेदी करताना दिसून आला.. ऋण काढून सण साजरा करण्याच्या प्रवृत्तीमध्ये झालेली वाढ ही आगामी काळात पाश्चिमात्य संस्कृतीसाठी जितकी चिंताजनक असणार आहे..

त्यापेक्षा ती भारतीय संस्कृतीसाठी चिंताजनक असणार आहे.. आपल्या देशात देखील पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याचे एक खूळ किती बोकाळलेले आहे. याची सुज्ञ – सुजाण असलेल्या नागरिकाला जाणीव आहे, पण या संवेदनशील विषयाला हात कोण लावणार हा मुद्दा आहे..

खरे तर पूर्वीच्या काळापासून दोन प्रकारची गुंतवणूक सूत्र चालत आलेली आहेत. ती अशी की,

* उत्पन्न-खर्च= बचत

ही लोक पगार किंवा मासिक उत्पन्न आल्यानंतर त्यातून नियमित खर्च करतात आणि उरलेल्या पैशांची बचत करतात. त्यातूनच जर कधी वाटलं तर मग गुंतवणूक करतात.

* उत्पन्न – बचत = खर्च

ही थोडीशी हुशार लोक असतात. ते आधी बचतीचा विचार करतात. विशिष्ट रक्कम बाजूला ठेऊन उरलेल्या पैशातून भागवतात. या सूत्राला थोडंस बदललं तर सामान्य नागरिकाच्या गरजेचं सूत्र आपोआप तयार होतो ते असे.

* उत्पन्न- गुंतवणूक= खर्च

याचा अर्थ असा की तुमचं आर्थिक नियोजन उत्कृष्ट आहे. म्हणजे आपण आपले ध्येय निश्चित केले असून त्यानुसार गुंतवणूक करत आहोत आणि उरलेल्या पैशातून खर्च भागविण्यात येत आहे किंवा येणार आहेत. कारण आज आपण गुंतवणूक केली नाही तर भविष्यातील आपलेच ध्येय आणि भविष्यात येणाऱ्या वृद्धापकाळात आपलेच आर्थिक नुकसान होणार आहे.

कोणतीही गुंतवणूक ही लगेचच परतावा देत नाही. त्यासाठी किमान पाच ते दहा वर्षाचा कालावधी द्यावा लागतो.. खरतर गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक ताण कमी व्हावा या हेतूनेच केलेली असावी. आपण आज एखादा प्लॉट किंवा फ्लॅट वगैरे खरेदी केला असेल तर उद्या त्यात परतावा मिळत नाही. बँकेत असणारी मुदतठेव सुद्धा लगेच अपेक्षित परतावा देत नाही. आता मुदत ठेवीवर मिळणारे व्याज साधारण ६.७५% ते ८% या दराने आहे. जर मागच्या दहा वर्षाचा आढावा घेतला तर २०१३ पेक्षा आता मिळणारे व्याज हे तुलनेने कमीच झालेले आहे. सोने, चांदी यांच्या दरामध्ये झालेली वाढ असो की जमिनी, फ्लॅट या सर्वच क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात हाच प्रकार दिसून येईल.

सातत्याने घटत जाणारे व्याजदर आपण आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहोत हेच सुचित करतात.. उदा. द्यायचे झाले तर जपानमधील मुदत ठेवीवर मिळणारा व्याजदर हा -०.२३ इतका आहे.. मग आपण या महासत्ता असणाऱ्या देशांमध्ये कुठे आहोत याचा एक अंदाज येईल.. कदाचित आपल्याकडे एवढा व्याजदर कमी होण्यासाठी अजुन बराच काळ लोटला जाईल.. पण तोपर्यंत आपल्याला गुंतवणूकीसाठी नवीन पर्याय उभे करावे लागतील किंवा आता उपलब्ध असणाऱ्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

सांगायचं झालं तर शेअर बाजार, Mutual Fund, Systematic Investment Plan (sip), बाँड, सोने, जमीन यात दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणुक जास्तीचा परतावा निश्चित देऊ शकेल..

एखादा वृक्ष जसा विविध ऋतूमध्ये ऊन-वारा-पाऊस झेलून डेरादार होऊन बहरत जातो तशीच आपलीही गुंतवणूक बहरत गेली पाहिजे. आपल्याकडून होणारी गुंतवणूक ही आपल्या आर्थिक गरजेनुसार आणि आपल्या मासिक उत्पन्नाच्या साधारण ५% ते २५% तरी केली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना त्यातील जोखीम आणि जमेच्या बाजूंचा विचार केला पाहिजे. कुठल्याही गुंतवणुकीला जितका जास्त वेळ द्याल तितकाच चांगला नफा मिळेल ! दरम्यानच्या काळात चढ-उतार येतील पण योग्य ठिकाणी आणि आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक असेल तर चांगला नफा निश्चित आहे !

– प्रणव कानडे

ता. क. :- भविष्य काळातील आर्थिक गुंतवणूक कोणत्या प्रकारची असावी, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या मॅगझिनमधून हवी असेल किंवा याविषयी जागृती होणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर तसा अभिप्राय नक्की नोंदवावा ही नम्र विनंती..