पाकिस्तानचं अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकनं सामंजस्य कराराचं उल्लंघन केलं. भारतीय सैन्याला या विरोधात कडक पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.
एलओसीवर सध्या गोळीबार होत नाहीय. श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झाला नाही. तसेच ब्लॅकआउटही झाला नाही. ड्रोनशी संबंधित माहिती काही वेळानंतर दिली जाईल, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.
७ मे पासून सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर आज अखेर थांबविण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी सामंजस्य करार केला असून आज सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची माहिती दिली. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला. भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामासाठी तयार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहिल.”
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रविरामावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.