कोलकातामधील ज्या कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या रुग्णालय व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने निलंबित केले आहे. ही कारवाई अशावेळी झाली आहे, जेव्हा केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने आरजी कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यकाळात रुग्णालयात झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे.

कोलकात्याच्या आर. जी. कर रुग्णालयात बलात्कार-हत्या प्रकरण हाताळण्यात आर्थिक अनियमितता आणि त्रुटींमुळे चौकशीसुरू असलेले संदीप घोष यांचे सदस्यत्व इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) निलंबित केले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी नेमलेल्या शिस्तपालन समितीने आयएमए कलकत्ता शाखेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी पहाटे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर रात्रपाळी दरम्यान बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. गंभीर जखमांच्या खुणा असलेला तिचा मृतदेह डॉक्टरांना हॉलमध्ये आढळला होता.

आयएमएने म्हटले आहे की, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पीडितेच्या पालकांची भेट घेतली, ज्यांनी संदीप घोष यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीबद्दल तक्रारी व्यक्त केल्या.

या व्यतिरिक्त, आयएमए बंगाल राज्य शाखा आणि इतर वैद्यकीय संघटनांनी आपण एकूणच या व्यवसायाची बदनामी केल्याचे कारण देत कारवाईची मागणी केली. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने २४ ऑगस्ट रोजी संदीप घोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने वैद्यकीय महाविद्यालयातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली होती.

आर. जी. कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात सीबीआयने अजामीनपात्र कलमे दाखल केली आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाने सीबीआयला तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

तपासाचा एक भाग म्हणून सीबीआयने घोष यांची पॉलीग्राफ चाचणी करून पुढील माहिती गोळा केली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 ऑगस्ट रोजी संदीप घोष आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंधित कोलकात्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते.