kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

गीत, नृत्य, अभिनय या तिन्हींचा उत्तम संगम म्हणजे लावणी. गेल्या काही वर्षांपासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख, मान -सन्मान मिळत आहे. महाराष्ट्राची ही लोककला एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे. लावणीला लोककलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. तसेच लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सांस्कृतिक कला व लावणी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह,सातारा रोड, पद्मावती, येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महामंत्री विक्रांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमित गोरखे, आमदार भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर,माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, श्रीनाथ भीमाले, वर्षा तापकीर ,अमृता मारणे, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री सुरेखा कुडची, मेघा घाडगे, नितीन वाबळे, रूपाली धाडवे, महोत्सवाच्या आयोजक, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे स्वागतोस्तुक सोनू मारुती चव्हाण, महेश भांबीड, विद्या पोकळे पाटील, शहाराध्यक्ष जतीन पांडे, धनंजय वाठारकर आणि संस्कृतिक प्रकोष्ठ चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कलावंत म्हणजे मनोरंजन आणि सांस्कृतिक ओळख जपणारा कार्यकर्ता. कलेचा संगम आणि विचाराचा देणं देण्याचं काम कलाकार करत असतो. कलावंतांमुळेच हे जग सुंदर आहे. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी त्या काळी क्रांती केली आपल्या कलेच्या माध्यमातून एक समाज जागृती च काम केलं राष्ट्रनिर्मितीचं काम केलं. त्याप्रमाणे आज मुंबई असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ किंवा मराठवाडा असेल त्या त्या भागातील कलागुणांना एकत्र करून एक सांस्कृतिक महाराष्ट्र निर्मितीचे काम करणे गरजेचे आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र हा वेगवेगळ्या कलागुणांनी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला आहे. अशावेळी त्या त्या भागातील लोककलाकारांना त्या त्या स्थानिक पातळीवर न्याय मिळवून देण्याचे काम केलं गेलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी अशा सर्व लोक कलावंतांच्या पाठीमागे खंबीर पणे उभी राहील, असा शब्द देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित लोककलावंतांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, महाराष्ट्राची लोककला आजच्या पिढीला माहिती नाही, काही प्रमाणात आपली लोककला लोप पावत चालली आहे, त्याला  चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. सध्या लोककलेच्या नावाखाली काही ठिकाणी धांगडधिंगा सुरू आहे, काळानुसार बदल घडणार आहे, स्थित्यंतर होणार आहे, मात्र त्यावेळी आपल्या संस्कृतीचा मान आणि परंपरेची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे, लोककला चुकीच्या पद्धतीने सादर केली गेली तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, आज पारंपारिक कला सादर करणाऱ्या काही कलावंताना  घरी बसण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवाने सत्य आहे. कारण डीजे वर नृत्य म्हणजे लावणी नाही, कुणाच्याही पोटावर पाय देण्याचा आमचा हेतु नाही डीजे वाल्यांनी अश्या नृत्य प्रकारांना वेगळे नाव द्यावे परंपरेला गालबोट लावू नये.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.