इस्त्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध अजून चालूच आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या गाझावर हवाई हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याने नुकताच गाझातील राफाह शहरावर हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राफाहमधील कारवाईमुळे इस्रायलचा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याबाबत नुकतेच भाष्य केले होते. यातच आता एका अमेरिकन सिनेटरने इस्रायलला अणुबॉम्ब देण्यासंबंधी भाष्य केले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाची तुलना त्यांनी दुसऱ्या महायुद्धाशी केली. ते म्हणाले की, ‘इस्रायल युद्ध हरु शकत नाही.’ 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून दोघांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे.
एका मुलाखतीदरम्यान, रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही पर्ल हार्बरनंतर एक राष्ट्र म्हणून विनाशाचा सामना करत होतो, तेव्हा आम्ही हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून युद्ध संपवण्याचा प्रयत्न केला होता…तोच योग्य निर्णय होता. ते पुढे म्हणाले की, ‘इस्रायललाही (Israel) अणुबॉम्ब द्या. ते युद्ध हरु शकत नाहीत.’ ते पुढे म्हणाले की, ‘इस्रायलने एक ज्यू राष्ट्र म्हणून जे काही शक्य असेल ते त्याने केले पाहिजे.’ ते पुढे असेही म्हणाले की, ‘अमेरिकेने (America) हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून धोका दूर करणे कितपत योग्य होते? आम्ही केले तर ते कसे योग्य आहे? ते बरोबर होते असे मला वाटते. अशा परिस्थितीत इस्रायलनेही एक ज्यू राष्ट्र म्हणून टिकून राहण्यासाठी जे काही शक्य आहे ते त्याने करावे.’
यावेळी त्यांनी हमासवर घातपात घडवल्याचा आरोपही केला. ग्रॅहम म्हणाले की, ‘’मला वाटते की जोपर्यंत हमास स्वत:च्या लोकांना मानवी ढाल म्हणून वापरणे थांबवत नाही तोपर्यंत गाझामधील नागरिकांचे मृत्यू कमी होणे अशक्य आहे. कोणत्याही शत्रूने नागरिकांचा जीव धोक्यात टाकल्याचे मी युद्धाच्या इतिहासात कधीच पाहिले नाही.’’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अलीकडेच इस्रायलला 3 हजार बॉम्बची डिलिव्हरी थांबवल्याचे वृत्त आहे. इस्रायलने राफाहमध्ये मोठी कारवाई सुरु केल्यास आणखी शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला जाईल, अशी शपथही त्यांनी घेतली आहे.