Breaking News

महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे टीका करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे.

तुमच्या – आमच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे तर फायदा होणार आहे अन्यथा महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे खालच्या पातळीवर टिका करत असून उमेश पाटील यांनी आज त्यांचा समाचार घेतला. तसेच शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तात्काळ दखल घ्यायला सांगितले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या महायुती सरकारकडून ज्या मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना गालबोट लागेल. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. याची नोंद आपण घेतली पाहिजे आणि विजय शिवतारे यांचे तोंड ताबडतोब बंद केले पाहिजे. जर हे असेच चालूच राहिले तर निश्चितपणे राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, अजितदादांवर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांना या संपूर्ण महायुतीमधील निर्माण होणाऱ्या अडचणींना जबाबदार म्हणून मुख्यमंत्र्यांना धरावे लागेल असा स्पष्ट इशाराही उमेश पाटील यांनी यावेळी दिला.

विजय शिवतारे यांना शांत करणे हे शिवसेना नेते म्हणून तुमचे काम आहे. आमचा कोण कार्यकर्ता जर मुख्यमंत्र्यांवर बोलत असेल तर त्याचा ताबडतोब बंदोबस्त करु, जर कोण ऐकत नसेल तर पक्षातून त्याची तात्काळ हकालपट्टी करु परंतु निवडणूकीच्या तोंडावर हे चित्र बरोबर नाही असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अजितदादांमुळे किडनी फेल झाली हे कुठल्या स्तराला जाऊन शिवतारे यांनी बोलावे. शिवतारे यांना तीन कुटुंब आहेत. या तीन कुटुंबांचा ताण झेपला नाही म्हणून त्यांच्या किडन्या फेल झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग याचे खापर अजितदादांवर का फोडता असा सवाल करतानाच शिवतारे तुम्हाला तुमचं कुटुंब सांभाळता येत नाही आणि आरोप अजितदादांवर कशाला करता.’तीन बायका फजिती ऐका’ अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये याची काळजी घ्या असा इशाराही उमेश पाटील यांनी दिला.