kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आधुनिक तंत्रज्ञानाचा ;कीर्तनासाठी वापर व्हावा !! – दयानंद घोटकर (अध्यक्ष ,गानवर्धन-पुणे).

कीर्तन हे समाज प्रबोधनाचे सक्षम माध्यम आहे , सर्व स्तरावरील लोकांनी या कलेकडे आपलेपणाने पाहण्याची नितांत गरज आहे. असे राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प मोरेश्वर नागनाथ जोशी चऱ्होलीकर म्हणाले. निमित्त होते ह भ प भागवताचार्या दया कुलकर्णी लिखित ‘भगवतीलीला कीर्तनमाला-पुष्प पहिले’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे !! दिनांक २८ जून २०२४ रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प मोरेश्वर नागनाथ जोशी चऱ्होलीकर , दयानंद घोटकर , रविंद्र पाध्ये यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गायक व साहित्यिक दयानंद घोटकर यांनी भूषवले.

राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प मोरेश्वर नागनाथ जोशी चऱ्होलीकर म्हणाले की, कीर्तन हे माध्यम अभ्यासपूर्णपणे, संयमाने आणि प्रसंगावधान बाळगून उत्तम गायन, संगीत व वक्तृत्व यांचा सखोल अभ्यास करून जोपासले पाहिजे. दया कुलकर्णी या माझ्या शिष्या असून त्यांनी लिहिलेले ‘भगवतीलीला कीर्तनमाला-पुष्प पहिले’ हे पुस्तक सर्व स्तरातील लोकांनी जरूर वाचावेच ,पण तरुण पिढीने देखील आवर्जून वाचावे याचे कारण असे की, देवी भागवताचे महत्व यातून सोप्या भाषेतून विषद केले आहे. आपण समाजात राहतो. म्हणजे समाजाचे देणे लागतो ,निवडूंगा विठ्ठल मंदिराच्या पवित्र वास्तूत पालखी येण्याच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम होत आहे ,हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे असे ते म्हणाले. तसेच या प्रसंगी त्यांनी लेखिका दया कुलकर्णी यांना कीर्तनरूपी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर गानवर्धन पुणेचे अध्यक्ष दयानंद घोटकर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की , कीर्तन हे समाजप्रबोधनाचे चपखल माध्यम आहे. दया ताईंची ओघवती लेखणी व स्पष्ट वक्तृत्व याने पुस्तक उत्तम झाले आहे. कीर्तन कलानिधी कै. ह. भ. प. डॉ.अनंतबुवा मेहेंदळे यांचा पूर्वरंग या पुस्तकांतून उत्तम मांडलेला आहे. ‘जुनं हेच सोनं’ या उक्तीप्रमाणे परंपरा आणि प्रवाह कीर्तनाच्या माध्यमातून या पुस्तकद्वारे टिकवला गेला आहे. आज तरुणांनी कीर्तन या माध्यमाकडे वळण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा म्हणजे व्हात्सअप ,फेसबुक,इंस्टग्राम,गुगल यांचा समावेश यात केला पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखिका ह भ प दया कुलकर्णी यांनी केले. त्या म्हणाल्या की, हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका देवी भागवत आणि त्यातील कथानक व स्त्रीचे २१ व्या शतकातील महत्व हे जाणून घेण्यासाठी कीर्तन हे माध्यम उचित आहे. त्यातून सुसूत्रपणे देवीच्या शक्ती पिठांचे दैवी दाखले देत सोप्या आणि अस्खलित मराठीत कीर्तने मांडण्याचा प्रयत्न मी यात केला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन तनया ईशा प्रकाशन पुणे यांनी केले असून युवा कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे यांनी संपादन केले आहे. तसेच या पुस्तकाला श्रुती तिवारी, हिमानी रानडे यांचे संपादन सहाय्य तसेच अर्चना कुंभार यांचे मुखपृष्ठ सजावट सहाय्य अलका पाटील, सागर बाबर, सचिन धुरी यांचे वितरण सहाय्य लाभले आहे असे यावेळी दया कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाल्या.

या प्रसंगी निवडूंगा विठ्ठल मंदिरचे विश्वस्त रविंद्र पाध्ये, हार्मोनियम वादक प्रमोद संत यांची विशेष उपस्थिती होती. व नचिकेत मेहेंदळे ,अॅड. धनंजय कुलकर्णी आणि चैत्राली जोशी यांचे या संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य लाभले. या कार्यक्रमात तन्मयी मेहेंदळे यांनी शारदा गायन दुर्गा रागात ‘जय जय दुर्गे माता भवानी’ हे सादर केले त्याला प्रमोद संत यांनी हार्मोनियम साथ तर निवेदीता मेहेंदळे यांनी तबला संगत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ह भ प कीर्तन विशारद निवेदीता मेहेंदळे यांनी मानले.