मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये बारावीत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयन या विद्यार्थिनीने सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला म्हणून इतिहास रचला आहे. काम्या कार्तिकेयनने आफ्रिका (माऊंट किलिमंजारो), युरोप (माऊंट एल्ब्रुस), ऑस्ट्रेलिया (माऊंट कोसियुस्को), दक्षिण अमेरिका (माऊंट अकोनकागुआ), उत्तर अमेरिका (माउंट डेनाली), आशिया (माऊंट एव्हरेस्ट) हे शिखर सर केले.
भारतीय नौदलाने सांगितले की, सेव्हन समिट चॅलेंज पूर्ण करण्यासाठी चिलीच्या प्रमाणवेळेनुसार २४ डिसेंबर रोजी दुपारी ५.२० वाजता तरुण एव्हरेस्टर आपले वडील सीडीआर एस कार्तिकेयन यांच्यासमवेत माऊंट व्हिन्सेंट अंटार्क्टिकाच्या शिखरावर पोहोचली. भारतीय नौदलाने काम्या कार्तिकेयन आणि तिच्या वडिलांचे अभिनंदन केले आहे.
नेव्हीच्या प्रवक्त्याने एक्सवर पोस्ट केले की, ‘@IN_NCS मुंबईतील बारावीत शिकणारी काम्या कार्तिकेयन सात खंडांतील सात सर्वात उंच शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली आहे.’
मुंबईतील नौदलाच्या ज्या शाळेत काम्या बारावीचे शिक्षण घेत आहे, त्या न्यू चिल्ड्रन स्कूलनेही काम्याचे कौतुक केले आहे. शाळेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘अडथळे तोडून नवीन उंची गाठणे! इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्याने सातही खंडातील सर्वात उंच शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली.एनसीएस शाळेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.’
काम्या कार्तिकेयन ने एव्हरेस्ट सर केले, तेव्हा ती सोळा वर्षांची होती. तिने सांगितले की, जेव्हा तिने उत्तराखंडमध्ये पहिला ट्रेक केला तेव्हा ती ७ वर्षांची होती.