Breaking News

खून, निबंध आणि पापक्षालन ….

मद्यधुंद अवस्थेत, नंबर प्लेट नसलेले वाहन चालवताना दोन निर्दोष व्यक्तींचा खुन करणाऱ्या … होय खुनच करणाऱ्या (causing death by negligence ) धनदांडग्यांच्या मस्तवाल अल्पवयीन तरुणाला निबंध लिहिण्याची आणि १५ दिवस वाहतूक नियंत्रण करण्याची अट घालून जामिन मंजूर करणाऱ्या न्यायालयाच्या मेंदूला २१ तोफांची सलामी ….

इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार पोलिस असे म्हणले की घडलेला गुन्हा गंभिर स्वरुपाचा नसल्याचे न्यायालयाला आढळल्यामुळे न्यालयाने जामिन मंजुर केला. आता वाहन परवाना नसताना दारू पिऊन, गाडी भरधाव वेगाने चालवून दोन अभियंत्यांचा खुन करण्याचा गुन्हा गंभीर नाही. मग गंभीरतेची व्याख्या काय आहे. धन्य ते न्यायालय. धन्य ती तपास यंत्रणा.

आता यात सर्वोत्तम कोण …. दोन लोकांचा मृत्यु झालाय हे दिसत असुन नियमांचे कातडे डोळ्यावर पांघरून बसलेली न्याय व्यवस्था की न्यायालयात सादर करायच्या तत्थ्यांमध्ये सरमिसळ करून घटना सौम्य असल्याचे न्यायालयाला भासविणारी तपास यंत्रणा.

केवळ कायद्यात लिहिलय म्हणून तो १७ वर्षांचा तरुण अल्पवयीन. दारू पिऊ शकतो, विना परवाना वाहन चालवू शकतो, आणि दोघांचा खुन करू शकतो, तरीही तो अल्पवयीन. बारावीची परिक्षा दिली आहे असे कुठे वाचले. आता बारावीची परिक्षा देणारा यमदुत हा अल्पवयीन कसा होऊ शकतो हे केवळ आपल्या कायद्यातील पळवाटाच सिद्ध करू शकतात. वर मदतीला स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार आणि इतर पुढारी तत्पर असतात. आमच्यावर दबाव आहे असे सांगत अशा केसेसमध्ये तपास यंत्रणांमधील सो कॉल्ड सिंघम सुशेगात जातात.

भविष्यातील स्वप्नांचे आणि कौटुंबिक जबाबदारीचे ओझे खांद्यावर घऊन मध्यप्रदेशातून पुण्यात आलेल्या दोघा तरुण संगणक अभियंत्यांच्या आकांशा एका सेकंदात चिरडल्या गेल्या. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे चेहरे न्यायासनाच्या डोळ्यासमोर आले नसतील कारण न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे.

लोकांचा आजही नायपालिकेवर थोडा विश्वास आहे. मात्र निबंध लिहा किंवा वाहतूक नियंत्रण करा अशा अटी घालून जामिन मिळू लागल्यास लोकांचा न्याय पालिकेवरील उरला-सुरला विश्वासही उडू लागेल. वरिष्ठ न्यायालयांनी या घटनेची आणि खालच्या न्यायालयाच्या निर्णयाची स्वाधिकारे अर्थात सु-मोटो दखल घेऊन चौकशी करावी आणि न्यायव्यवस्थेमधील लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी प्रयत्न करावा.

कायद्यातील पळवाटांचा वापर करून अजून एक गोंडस बाळ दोघांना जीवे मारून घरी एसीत शांतपणे झोपायला मोकळा झाला. त्याचापासून प्रेरणा घेऊन सर्व सामान्याना चिरडण्यासाठी तयार असलेले अनेक अल्पवयीन तरुण तरुणी वाहनरूपी हत्यार घेऊन शहरात फिरत आहेतच. कोण कमनशिबी नागरिक त्यांच्या वाहनाखाली येतो याचीच फक्त वाट पहायची. पोलिस वाहतूक विभाग, आरटीओ कुणाचंच त्यावर नियंत्रण नाही.

अशा प्रकारे रस्त्यावर तडफडून मरण्याऱ्यांच्या यादीत उद्या कदाचीत माझाही नंबर असेल कारण शहरातील रस्त्यावरून मी सुद्धा दुचाकी चालवतो.

सडलेली सिस्टीम … विकली गेलेली यंत्रणा … पैशा समोर सगळेच गुलाम
रस्त्यावर मरणारा
पाण्याशिवाय तडफडणारा
उपाशी पोटाला फडकं बाधणारा
शेतात झाडाला लटकणारा
परिस्थिती समोर सगळेच गुलाम
सडलेली सिस्टीम, विकली गेलेली यंत्रणा, पैशा समोर सगळेच गुलाम
लाच घेणारा
लाच देणारा
लाचारीने खुर्चीवर बसणारा
घोडेबाजार करणारा
बाजारात घोडा बनणारा
घोड्यांवर विश्वास ठेऊन गाढव बनणारा
व्यवस्थे समोर सगळेच गुलाम
सडलेली सिस्टीम, विकली गेलेली यंत्रणा, पैशा समोर सगळेच गुलाम
न्याय देणारा
न्याय घेणारा
ते मिळवून देण्याचे आश्वासन देणारा
न्याय मिळतो अशी भाबडी आशा लावणारा
निती समोर सगळेच गुलाम
सडलेली सिस्टीम, विकली गेलेली यंत्रणा, पैशा समोर सगळेच गुलाम
मंदिरात जाणारा
मशिदीत जाणारा
गिराजाघरात जाणारा
फतव्यांवर विश्वासून आग ओकणारा
धर्मा समोर सगळेच गुलाम
सडलेली सिस्टीम, विकली गेलेली यंत्रणा, पैशा समोर सगळेच गुलाम
रुग्णालय डॉक्टरांचे
डॉक्टर तंत्रज्ञानाचे
तंत्रज्ञान ते हाताळणाऱ्यांचे
रुग्ण डॉक्टरांचे
आरोग्य सेवेत सर्वच गुलाम
सडलेली सिस्टीम, विकली गेलेली यंत्रणा, पैशा समोर सगळेच गुलाम
नोकरदार साहेबाचा
साहेब मालकाचा
मालक सरकारचा
सरकार धनदांडग्यांचा
सार्वजनिक जीवनात सर्वच गुलाम
सडलेली सिस्टीम, विकली गेलेली यंत्रणा, पैशा समोर सगळेच गुलाम
@highlight

  • अमेय पोळेकर