जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे या जवानाला आज अखेरचा निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते. आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने पतीला अखेरचा निरोप दिला.
6 मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील 29 वर्षीय सचिन वनंजे या जवानाचा मृत्यू झाला होता. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काल रात्री सचिन यांचं पार्थिव देगलूरला आणण्यात आलं. त्यावेळी पत्नी, भाऊ आणि आई वडिलांसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
सचिन वनंजे हे देगलूर तालुक्यातील दमलोर इथले मूळ रहिवासी होते. ते सध्या देगलूरमधील फुले नगर इथं राहत होते. 2017 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले होते. सचिन यांची पहिली पोस्टिंग सियाचीनमध्ये होती. त्यानंतर पंजाबमधील जालंधर इथं त्यांनी सेवा बजावली.
गेल्या दीड वर्षापासून ते श्रीनगर इथं ड्युटीवर होते. त्यानंतर 6 मे रोजी सचिन यांची दुसरीकडे पोस्टिंग झाली होती. त्यासाठी संबंधित चौकीकडं सैन्य दलाचं वाहन घेऊन जात असताना 8000 फूट खोल दरीत त्यांचं वाहन कोसळलं. या दुर्घटनेत सचिन वनंजे यांनी जीव गमावला. सचिन वनंजे यांचा विवाह 2022 मध्ये झाला होत. सचिन यांच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ, पत्नीसह आठ महिन्यांची मुलगी आहे.