ज्येष्ठांचे आरोग्य, विविध शासकीय योजना, आर्थिक नियोजन तसेच वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शक असलेले ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग कार्यरत आहे. त्यांच्यासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना, कायदे व सोयीसवलती याविषयीची जनजागृती, वेगवेगळे उपक्रम आणि कार्यशाळांच्या माध्यमांतून केली जाते. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद मेळावे आयोजित करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय पुरस्कारही देण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्यापुढील आव्हाने यावर मार्गदर्शन करण्याकरिता चव्हाण सेंटरने ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या मराठी व Silver Strength: A Guide To Senior Empowerment या इंग्रजी पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रकाशन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष व मुंबईच्या माजी महापौर निर्मलाताई सामंत-प्रभावळकर, अभिजित मुरुगकर, डाॅ कल्याणी मांडके, डाॅ. समीर दलवाई, पुस्तकाच्या लेखिका डाॅ.अनघा तेंडुलकर-पाटील आणि ॲड. प्रमोद ढोकले , भक्ती वाळवे, हेमराज पारकर, वारस पटेल, राजश्री गावडे, ख्याती शेखर, अमेय अग्रवाल, अमिषा प्रभू, विधी शहा, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, पुस्तकाचे प्रकाशक सतिश पवार यांच्यासह अभिजीत राऊत, दिपिका शेरखाने, आणि चव्हाण सेंटरचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे धोरण, केंद्र आणि राज्य सरकारचे ज्येष्ठ नागरिक धोरण याची माहिती, सायबर फ्रॉड पासून कसा बचाव करावा, इच्छापत्र व वैद्यकीय इच्छापत्र कसे बनवावे, वार्धक्यातील व्याधींवर नवीन तंत्रज्ञानाने केलेली मात, डिजिटल तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी कसे आणि किती उपयुक्त आहे याची माहिती, विविध व्याधींमध्ये फीजिओथेरपीचे महत्व, आरोग्य आणि आहार विषयक टिप्स, संपत्ती आणि जीविताच्या रक्षणासाठी मातापिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाच्या कायद्याचा वापर कसा करावा याबाबत या पुस्तकात उहापोह करण्यात आला आहे. स्वतःचे इच्छापत्र व वैद्यकीय इच्छापत्र घरच्या घरी कसे तयार करावे याबरोबरच ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल यात करण्यात आल्याने ज्येष्ठांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे झाले आहे, अशी माहिती यावेळी प्रकाशकांनी दिली.