kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नवोदित कलाकारांच्या अभिनयाने नटलेला ‘रांगडा’ ५ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव रांगडा हा चित्रपट देणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट ५ जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.

शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी “रांगडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

मराठीत आजवर काही चित्रपटांतून बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचं दर्शन झालं आहे. पण याच दोन खेळांवर बेतलेली कथा रांगडा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे कथासूत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकार कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू आहेत .या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील यात शंका नाही. त्यासाठी आता केवळ ५ जुलैपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.