ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या पत्रकार परिषदेमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या पत्रकार परिषदेत जडेजाने ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत नव्हे तर हिंदीत उत्तरे दिली. सोबतच यानंतर बस पकडायची आहे, असे सांगून त्याने पत्रकार परिषदही लवकर संपवली.
ऑस्ट्रेलियन मीडिया आता जडेजाच्या या पत्रकार परिषदेवर टीका करत असून त्याचे वागणे विचित्र होते, असे सांगत आहे. अवघ्या २ दिवसांपूर्वी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन पत्रकाराला फॅमिली फोटो काढल्याबद्दल फटकारले होते. जडेजाच्या पत्रकार परिषदेनंतर ऑस्ट्रेलियन मीडिया त्याच्यावर टीका करत आहे. चॅनल-७ ने याला अजब पत्रकार परिषद म्हटले.
रवींद्र जडेजाने शनिवारी मेलबर्नमधील प्रशिक्षण सत्रानंतर पत्रकार परिषद घेतली. येथे जडेजाने हिंदीत उत्तरं दिली. ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ नुसार, जडेजाने इंग्रजीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला.
भारताच्या मीडिया टीमने त्याच पत्रकारांकडे लक्ष दिले ज्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी होती. काही ऑस्ट्रेलियन पत्रकारही तिथे होते. पण जडेजाने फक्त हिंदीत उत्तर दिले. यानंतर जड्डूने पत्रकारांना बस पकडायची असल्याचे सांगितले आणि पत्रकार परिषद संपली. भारताच्या मीडिया टीमने सांगितले की, ही परिषद केवळ प्रवासी भारतीय मीडियासाठी होती.