kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. ‘या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचं हार्दिक अभिनंदन. राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड यश द्यावं,’ अशा शुभेच्छा मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

शिवाजी यांनी ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘नायक’, ‘सूर्यवंशम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यांना ‘सीआयडी’ या मालिकेनं केवळ वेगळी ओळखच नाही दिली, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांच्या नावाला समाविष्ट केलं.

आशा पारेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक दमदार चित्रपट दिले आहेत. ‘जब प्यार किसी से होता है’, ‘तिसरी मंजील’, ‘दो बदन’, ‘कन्यादान’, ‘कटी पतंग’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.

यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येतं.