Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा, म्हणाले..

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीच्या घटना देखील अनेकवेळा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी रात्री मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अमित शाह यांनी काय म्हटलं?

“जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गंगानगीरमध्ये नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. या दुःखाच्या प्रसंगी मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर सोनमर्गला जोडणाऱ्या झेड-मोर बोगद्यावर काही कामगार काम करत होते. मात्र, हे काम करत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काम करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

दरम्यान, काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिर्डी यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की, “गगनगीर येथे मजुरांवर झालेल्या भयंकर आणि भ्याड हल्ल्याची अत्यंत दु:खद बातमी. हे लोक या भागातील एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करत होते. मी नि:शस्त्र निष्पाप लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो,” असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात झालेल्या दहशतवादी हल्‍ल्‍यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काही कामगार आणि एका एक डॉक्टराचाही सहभाग आहे. या हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर जम्‍मू-काश्मीर पोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन केलं असल्याची माहिती सांगितली जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातून भारतीय लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ८ ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या १६१ तुकडीतील दोन सैनिक अनंतनागमधील जंगल परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी या दोन जवानांचे अपहरण दहशतवाद्यांनी केले होते. या दोन जवानांपैकी एकजण दहशतवाद्यांच्या तावडीतून कसा तरी पळून येण्यास यशस्वी झाला होता. मात्र, दुसऱ्या एका जवानाचा मृतदेह जंगलात भारतीय लष्कराला आढळून आला होता.