kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवसेनेचे ‘जोशी सर’ गेले ! बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची होती ओळख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे निदान झाले. त्यानंतर मनोहर जोशी यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती.

ऑक्टोबर २०१३ च्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय, त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते.