Breaking News

भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा भिवंडीत तणाव निर्माण झाला होता.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी हा प्रकार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत विसर्जन मिरवणूक मार्गस्थ केली. यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला, ज्यामध्ये अनेक जखमी झाले आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, “गणपती विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या घटनेनंतर मिरवणूक शांततेत पुढे गेली. मात्र, दगडफेक झाल्यानंतर परिस्थिती चिघळली होती. त्यामुळे काही लोकांमध्ये वाद आणि बाचाबाची झाली व तणाव निर्माण झाला.”

“परिस्थिती आता नियंत्रणात आहे, आणि हा प्रकार करणाऱ्यांचा कारवाईसाठी शोध घेण्यात येत आहे. काही जणांना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल,” असे चव्हाण पुढे म्हणाले.

या घटनेनंतर मंडळाचे लोक घटनास्थळी आक्रमक झाले होते. यावेळी एका तरुणाला जमावाकडून मारहाणही केल्याचे समोर आले आहे. मूर्ती विसर्जनाच्या संदर्भात मंडळाच्या लोकांनी मागणी केली की जोपर्यंत पोलिस सर्व आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन केले जाणार नाही.

घटनेचे वृत्त समजताच इतर काही भागातील लोक घटनास्थळी आले आणि जय श्री रामच्या घोषणा देऊ लागले. काही वेळातच दोन्ही समाजातील लोकांची गर्दी वाढल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार महेश चौघुले त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिवाजी चौकात लोकांसह एकत्र येऊन कारवाईची मागणी केली.

घटनास्थळी डीसीपी श्रीकांत परोपकरी, अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले की, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.