kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण दुर्घटना; दरड कोसळून २००० हून जास्त लोकांचा मृत्यू!

शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी मोठी होती की त्यातून खाली आलेल्या मलब्याखाली शेकडो घरं जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातील संयुक्त राष्ट्राकडून रविवारी मृतांची संख्या ६७० देण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर सेंटरनं यूएनला लिहिलेल्या पत्रामध्ये ही संख्या २००० च्या वर गेल्याचं नमूद केलं आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी यांबलीमधल्या शेकडो घरांवर बाजूच्या डोंगराचा एक मोठा हिस्सा कोसळला. या भागात जवळपास ४ हजार नागरिक राहात होते, अशी माहिती पापुआ न्यू गिनीमध्ये आणीबाणीच्या स्थितीत बचावाची जबाबदारी असणाऱ्या CARE या संस्थेचे संचालक मॅकमोहन यांनी माध्यमांना दिली.

मात्र, असं असताना नेमकी किती लोकसंख्या दरडीखाली दबलेल्या गावात राहात होती, याचा अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पापुआ न्यू गिनीची शेवटची जनगणना २००० साली पार पडली होती. त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसार या गावाची सांगण्यात आलेली लोकसंख्या नंतरच्या काळात बरीच वाढली असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू वर्षात देशात जनगणना केली जाणार असल्याचं पापुआ न्यू गिनी सरकारनं जाहीर केलं आहे.