kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या २५व्या आवृत्तीचे दि. ३१ रोजी प्रकाशन

स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ सायं ५.०० वाजता टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे येथे प्रकाशन संपन्न होत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आशिष अचलेरकर यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन संपन्न होईल. राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ६७ वर्षे कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सहाय्यक समितीचा मानपत्र देऊन कृतज्ञता गौरव या समारंभात करण्यात येणार आहे.

नवी दिशा शोधून निरनिराळ्या क्षेत्रांत मार्गक्रमण करत उज्ज्वल भारताच्या विकासात बहुमूल्य योगदान देणारे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या सौ. सुनंदाताई पवार, तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. भरत गिते, कॉमसेन्स या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी स्टार्टअप कंपनीचे संस्थापक श्री. सागर बाबर आणि जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने प्रभावशाली युवा उद्योजिका म्हणून गौरविलेल्या लंडन येथील आर्या तावरे या पाच मराठी यशस्वी शिलेदारांशी डॉ. वासलेकर याप्रसंगी संवाद साधणार असून त्यासोबतच आपल्या नव्या वैचारिक अनुभवांचे भांडारही ते या निमित्ताने खुले करणार आहेत.

याचे संयोजन महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी दिली.