वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. “सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब अकोल्याला येऊन मला भेटले होते. त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. चौकशीत दिरंगाई होत आहे. त्यांना मदत अद्याप मिळालेली नाही. बरेच जण त्या कुटुंबाला त्रास देत आहेत”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“मुख्यमंत्र्यांना आणखी दोन गोष्टी सांगितल्या. नवी मुंबईत एका मुलीवर अतिप्रसंग झाला. त्या कुटुंबाला त्यांच्या जागेच्या बदल्यात नवी जागा द्यावी ही विनंती होती. त्यांचे स्थानांतर करण्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सूर्यवंशी प्रकरणात निर्देश देत आहेत. चौकशी ही फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
“हाणामारीची चौकशी घ्यावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. कोठडीत मृत्यू झाला, त्यामुळे मॅजिस्ट्रेटने चौकशी करायची असते. पोलीस त्यात काही करू शकत नाही. आम्ही जी मागणी केली होती ती मान्य झाली आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. “भाषा आणि मातृभाषा म्हणून अभिमान आहे. घरगुती वापर झालाच पाहिजे. देश म्हणून पाहतो, तेव्हा ती राष्ट्रीय भाषेला पर्याय म्हणून पाहू नये. ती घरगुती भाषा म्हणून संबोधले पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी महापालिका निवडणुकांवरही प्रतिक्रिया दिली. “22 तारखेनंतर निवडणूक होईल किंवा नाही ते कळेल. ओबीसी आरक्षणाचे घोंगडे अंगावर घेऊन कोणी निवडणूक करणार नाही”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.