kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, अजितदादांच्या आईचे विठ्ठोबाला साकडे

बारामतीच्या सत्ता वर्तुळात गेल्या दोन वर्षात मोठ्या घाडामोडी घडल्या. थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंधी सर्वांनी जवळून पाहिले. लोकसभा-विधानसभेतील चुरस उभ्या भारताने अनुभवली. राजकारणाचे परिणाम कुटुंब-कबिल्यावर दिसून आले. पण 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादांनी जातीने हजर राहत शुभेच्छा दिल्या. तेव्हा दोन पक्ष एकत्र आणण्याची हलगी वाजली. तर आता अजितदादांच्या आई आशाताई पवार यांनी थेट पांडुरंगालाच पवार कुटुंबातील मतभेद मिटवण्याचे, पुन्हा कुटुंब एकत्र येण्याचे साकडे घातले.

2019 वर्षानंतर राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना भाजपा खेम्यातून महाविकास आघाडीच्या बंधनात बांधली गेली. तर पुढे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. दोन गट दोन दिशेने गेले. एकाने पुरोगामीचा तर दुसर्‍याने उजव्या विचारसरणीचा झेंडा हाती घेतला. या पक्ष फुटीचा थेट परिणाम बारामतीच्या सत्ता वर्तुळात सुद्धा दिसून आला. अजित पवार-शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी फुटली. राज्याच्या राजकारणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली. दादा विरुद्ध थोरले पवार असा सामना दिसला. दिवाळी पाडव्याला दोन्ही पवार एकत्र न आल्याने गहजब झाला.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आशा पवार या पंढरपुरात आल्या. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुजा केली. यावेळी त्यांनी सर्व वाट मिटून पवार कुटुंब गुण्यागोविदांनं नांदू दे, असे साकडे विठ्ठलाला घातले. अजित पवार-शरद पवार हे एकत्र यावे यासाठी त्यांनी पांडुरंगाकडे विनंती केल्याचे त्या म्हणाल्या. पांडुरंग आपले गार्‍हाणे नक्की ऐकणार अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या प्रार्थनेमुळे कौटुंबिक स्तरावर अजूनही पवार कुटुंबियातील नाळ जुळलेली असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी दिल्ली येथील निवासस्थानी सहकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली. पण या केवळ अफवाच असल्याचे दिसून आले.