kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पाकिस्तानला 210 सीक्रेट पाठवणारा एटीएसच्या जाळ्यात, माहिती पाठवण्यासाठी किती पैसे घेतले वाचून बसेल धक्का

भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची गोपणीय माहिती पाठवणाऱ्या एका आरोपीला गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) पकडले आहे. आरोपी जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला देत होता. आरोपीचे नाव दीपेश गोहील आहे. तो ओखा पोर्टवर कर्मचारी आहे. त्याला ही माहिती देण्याच्या मोबदल्यात रोज फक्त 200 रुपये मिळत होते. या कामासाठी त्याने आतापर्यंत 42,000 रुपये घेतले आहे. म्हणजेच त्याने 210 सीक्रेट पाकिस्तानला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ 200 रुपयांसाठी त्याने देशाशी गद्दारी केली.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दीपेश फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला. ही एजंट स्वत:ला ‘साहिमा’ असल्याचे सांगून दीपेशसोबत बोलत होती. त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्यांचा संपर्क वाढला. एजंटने दीपेशकडून ओखा पोर्टवर असलेल्या कोस्ट गार्डच्या जहाजांचे नावे आणि नंबर मागितले होते. ती माहिती दीपेशने तिला दिली. त्या एजंटची खरी ओळख अजून समोर आली नाही.

एटीएस अधिकारी सिद्धार्थ म्हणाले की, दीपेश अनेक प्रकारची माहिती पाकिस्तानी एजंटला देत असल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. पाकिस्तानी नौदलाच्या एजंटला त्याने माहिती दिल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 200 रुपये घेऊन तो माहिती देत असल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्या बँक खात्याऐवजी तो मित्राच्या खात्यावर ही रक्कम मागवत होता. तो मित्राकडून रोख रक्कम घेत होता. ही रक्कम वेल्डींगच्या कामातून मिळत असल्याचे तो सांगत होता. आतापर्यंत त्याने 42,000 रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले.

गुजरात एटीएसने सांगितले की, पाकिस्तानी नौदलातील एजंट कोस्ट गार्डची माहिती मिळवण्यासाठी कमी पैशांत माहिती देणारे लोकांना शोधत आहे. गुजरात एटीएस कोस्ट गार्डसोबत समुद्र किनाऱ्यावरुन होणारी अंमलीपदार्थाची तस्करी रोखण्याचे काम करत आहे. अशावेळी कोस्ट गार्डच्या जहाजांची माहिती पाकिस्तानला उपयुक्त ठरणारी आहे. तसेच युद्धाच्या काळात ही माहिती कोणत्याही देशासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. मागील महिन्यातही पंकज केटिया याला अटक केली होती. तो ही कोस्ट गार्डची माहिती पाकिस्तानी एजंटला देत होता.