Breaking News

१३ टक्क्यांनी घसरून लिस्ट झाला सोलर कंपनीचा शेअर, पण नंतर कमाल झाली!

अ‍ॅक्मे सोलर होल्डिंग्सच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) बुधवारी १३ टक्क्यांनी घसरून २५१ रुपयांवर लिस्ट झाला. तर, मुंबई शेअर बाजारात अ‍ॅक्मे सोलरचा शेअर २५९ रुपयांवर लिस्ट झाला. मात्र, लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानं शेअर १० टक्क्यांनी वाढला.

आयपीओमध्ये अ‍ॅक्मे सोलर होल्डिंग्सच्या शेअरची किंमत २८९ रुपये होती. अ‍ॅक्मे सोलरचा आयपीओ ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि ८ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीचा एकूण पब्लिक इश्यू आकार २९०० कोटी रुपयांपर्यंत होता.

कमकुवत लिस्टिंगनंतर अ‍ॅक्मे सोलरच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर अ‍ॅक्मे सोलरचा शेअर १० टक्क्यांनी वधारून २७६.१० रुपयांवर पोहोचला. तर मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक वाढून २७९ रुपयांवर पोहोचला आहे. आयपीओपूर्वी कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा १०० टक्के होता, जो आता ८३.४१ टक्के झाला आहे. जून २०१५ मध्ये एकमे सोलर होल्डिंग्सची स्थापना करण्यात आली. कंपनी अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांपासून वीज निर्मिती करते.

अ‍ॅक्मे सोलर आयपीओ एकूण २.८९ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ३.२५ पट सबस्क्राइब झाला. तर कर्मचारी वर्गातील हिस्सा १.८५ पट सबस्क्राइब झाला. कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर २७ रुपयांची सूट होती. आयपीओमध्ये बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत १.०२ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा ३.७२ पट सब्सक्राइब झाला. अ‍ॅक्मे सोलरच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करण्याची संधी होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये ५१ शेअर्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *