मंदिर समितीकडे तुपाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा आणि विशेष यंत्रणा नसल्याचा पुरवठादारांनी गैरफायदा घेतला,’’ असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी श्‍यामला राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

‘‘तुपाची आणि प्रसाद बनविण्यासाठी लागणाऱ्या अन्य घटक पदार्थांची गुणवत्ता खूपच घसरली असल्याचे लक्षात आल्यानंतर पुरवठादारांना त्याबाबत सूचना देण्यात आली होती. दरम्यानच्याकाळात तुपाचे चार ट्रक येथे आले असता त्या तुपाची गुणवत्ता खराब आल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही ते चाचणीसाठी पाठविले असता, त्या तुपाच्या नमुन्यांमध्ये जनावरांची चरबी असल्याचे आढळले.’’ असे राव यांनी मान्य केले आहे.

संबंधित, पुरवठादाराला काळ्या यादीत टाकण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही राव यांनी सांगितले. दरम्यान, तिरुमला तिरुपती मंदिराला तुपाचा पुरवठा करणाऱ्या ए.डी. डेअरीने त्यांच्या तुपाची गुणवत्ता प्रमाणित करून मगच पाठविल्याचा दावा केला आहे.

वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पोन्नवोलु सुधाकर रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, तिरुमला तिरुपती देवस्थानम् येथील प्रसादावरील वादाच्या निमित्ताने जगनमोहन रेड्डी यांना बदनाम करण्याची मोहीम सुरू करण्यात आली अलसून ती तातडीने थांबविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सुधाकर रेड्डी यांनी केली आहे.

याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून या रेड्डी यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांची सत्यासत्यता तपासावी अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होईल असे न्यायालयाने सांगितले.