तिरुपती बालाजीच्या लाडू प्रकरणावरुन दोन दिग्गज अभिनेते आमने-सामने आले आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनी तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टिका केली आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडिया ट्विट करत लिहिले की, हा मुद्दा तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर का न्यायचा आहे. देशात आधीच खूप जातीय तणाव आहे. त्यावर पवन कल्याण यांनी त्यांना उत्तर दिले आहे.
प्रकाश राज यांच्या या वक्तव्यावर पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण म्हणाले की, “मी या विषयांवर का बोलू नये? प्रकाश राज, मी तुमचा आदर करतो, आणि जेव्हा धर्मनिरपेक्षतेचा प्रश्न येतो तेव्हा ते परस्पर असले पाहिजे. तुम्ही माझ्यावर का टीका करत आहात हे मला समजत नाही? मी याबद्दल बोलू शकत नाही का? मी सनातन धर्माबद्दल खूप गंभीर आहे.
उपमुख्यमंत्री पवन कल्याण पुढे म्हणाले की, “माझ्यासाठी सनातन धर्म सर्वात महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक हिंदूसाठी देखील तो तितकाच महत्त्वाचा असावा. पवन कल्याण म्हणाले की, ‘इतर कोणत्या धर्मात अशी घटना घडली असती तर आतापर्यंत मोठे आंदोलन छेडले गेले असते. ‘
पवन कल्याण यांनी या प्रकारानंतर राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते की, “तिरुपती बालाजीच्या प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ आढळून आल्याने आम्ही अतिशय अस्वस्थ आहोत. कदाचित संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे.”
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा मुद्दा सर्वात आधी उपस्थित केला होता. यानंतर राष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली गेली. केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देखील हे गंभीर असल्याचे म्हटले आहे.