Breaking News

विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी; मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन

कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवासांपूर्वी समोर आला होता. या प्रकरमातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल गवळीने यापूर्वीही विनयभंगासारखे गुन्हे केले होते. पण मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र दाखवून यापूर्वी दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. दरम्यान या अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे पळून गेला होता. त्याला तेथून पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने विशाल आणि त्याच्या पत्नीला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी त्यांना आरोपीला दोन-तीन महिन्यात फाशी होणार, असे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर कल्याण येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, “मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आरोपींना फाशी द्या. यावर मुख्यमंत्र्‍यांनी तुम्ही घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात आरोपीला फाशी होणार असं सांगितलं आहे”. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली जाणार असून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या वडिलांच्या भेटीदरम्यान त्यांना सांगितले आहे. विशाल गवळी हा दोन नंबरचा धंदा करायचा, मारण्याची धमकी द्यायचा,परिसरात विशालची होती दशहत अशी माहितीही पीडितेच्या वडिलांची माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, विशाल गवळीने केलेल्या बालिकेच्या हत्येविषयी कल्याण परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष या घटनेचा निषेध करण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चे आणून विशाल गवळीला फाशीची शिक्षा किंवा त्याला लोकांच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *