राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीतही केली. यावेळी ते म्हणाले, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसेच तो आपला अधिकारदेखील आहे. त्यामुळे देशात १०० टक्के मतदान व्हायला हवं. मी सकाळीच माझा अधिकार बजावला. मी आज दिवसभरातलं माझं पहिलं काम केलं आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून देशभरातील बहुतांश भागात दुपारी तापमानाचा पारा ४० अंशाच्या आसपास जातोय. नागपुरातही तीच परिस्थिती असल्यामुळे मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांग लावली आहे. मोहन भागवत यांनीदेखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दुपारी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास न होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.