kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अडीच वर्षांत चांगलं काम केल्यानेच विजयाची गुढी उभारु शकलो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या निमित्ताने ठाण्यातील हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले. त्यांनी लोकांचे, लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. अडीच वर्षांत महायुतीने चांगलं काम केल्याने आम्ही विजयाची गुढी उभारु शकलो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिराच्या शोभायात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने अनेक हिंदू बांधव शोभायात्रेत अत्यंत उत्साह आणि आनंदात सहभागी झाले आहेत. विविध चित्ररथ आणि संदेशांचा या शोभायात्रेत समावेश आहे. या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर दिग्गजांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नव्या सरकारची पहिली इनिंग सुरु झाली आहे आता समृद्धी आणि विकासाच्या गुढ्या उभारणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

आजचा दिवस मांगल्य आणि पावित्र्याचा दिवस आहे. आज ठाण्यातील कोपीनेश्वर महादेव मंदिराच्या वतीने जी शोभा यात्रा काढली जाते त्याचं २५ वं वर्ष आहे. या शोभायात्रेत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, अबालवृद्धांपर्यंत सगळेच जण आनंदाने सहभागी होतात. या शोभायात्रेत अनेक चित्ररथ असतात. चित्ररथांमधून सामाजिक संदेश देण्याचं काम, समाज प्रबोधनाचं काम हे दाखवलं जातं. मागच्या अडीच वर्षांत महायुतीने जे काम केलं त्यामुळे विजयाची गुढी आम्हाला उभारता आली. नव्या सरकारची पहिली इनिंग सुरु झाली आहे. समृद्धी आणि विकास यांच्या गुढ्या उभारणार आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ.

चैत्र नवरात्र उत्सव आहे तो नऊ दिवसांचा उत्सव आहे. राज्यात विकास, लोकांची प्रगती, कायदा-सुव्यवस्था, लाडक्या बहिणी, भाऊ, लाडके शेतकरी या सगळ्यांची प्रगती साधणं हे आमचं ध्येय असणार आहे असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *