देशातील अनेक सरकारी बँकांचे शेअर्स बुधवारी रॉकेटच्या वेगानं वाढले. यात युको बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर आघाडीवर होते. युको बँकेचा शेअर आज १३ टक्क्यांनी वधारून ५१ रुपयांवर पोहोचला. तर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर जवळपास ८ टक्क्यांनी वधारून ६१ रुपयांवर पोहोचला.
बिझनेस स्टँडर्डनं बाजार विश्लेषक अंबरीश बालिगा यांच्या हवाल्यानं या तेजीमागचं कारण दिलं आहे. ‘या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पतधोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या धोरणात्मक निर्णयाबद्दल गुंतवणूकदार आशावादी आहेतय पतधोरणाच्या निर्णयात बाजाराला काहीतरी सकारात्मक अपेक्षित असल्यानं सरकारी बँकांचे शेअर वाढण्याची शक्यता आहे, असं बालिगा यांनी सांगितलं.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील ६ सदस्यीय एमपीसीची बैठक ४ ते ६ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या समितीचा निर्णय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ६ डिसेंबर रोजी जाहीर करतील. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढीच्या कमकुवत आकड्यांवर आरबीआयनं उतावीळपणे प्रतिक्रिया देणं टाळावं, अशी अपेक्षा काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीतच व्याजदरात कपात होऊ शकते, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँक शुक्रवारी सलग अकराव्यांदा रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. तथापि, लिक्विडिटीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) कमी केला जाऊ शकतो किंवा मध्यवर्ती बँकेकडे ठेवींचे प्रमाण बदलले जाऊ शकते, असाही काही अभ्यासकांचा अंदाज आहे.