kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जेव्हा शाहाजहांने औरंगजेबाला हिंदूचं उदाहरण देत केला होता उपदेश! पाहा व्हिडीओ …

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरील छावा सिनेमानं यशाचे नवे रेकॉर्ड केले आहेत. या चित्रपटात संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, धर्मासाठी केलेलं बलिदान दाखवण्यात आलंय. संभाजी महाराजांना हालहाल करुन ठार मारणारा मुगल बादशाह औरंगजेबानं त्याच्या वडिलांना देखील सोडलं नव्हतं.

औरंगजेबानं त्याचे वडिल शाहजहांना कैद ठेवले होते. शाहाजहांला खाण्या पिण्याच्या गोष्टी देखील मोजक्या पाठवल्या जात. तीन चपात्या, मांसाचे दोन तुकडे, एका बशीत रस्ता आणि तुटक्या भांड्यात पाणी इतकंच शाहजहांला तुरुंगात दिलं जात असे.

उन्हाळ्याच्या दिवसात शाहाजहांनं पाहरेकऱ्यांकडं जास्त पाणी मागितलं होतं. त्यावर औरंगजेबानं जे मिळतंय त्यामध्येच जगा किंवा मरा, असं स्वत:च्या वडिलांना सुनावलं होतं. शाहजहांनं मरताना त्याचा मुलगा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात भारतीयांबाबत येथील हिंदू धर्माच्या परंपरेबाबत शिकवण दिली होती. कवी कुमार विश्वास यांनी हा किस्सा सुनावला होता.

कुमार विश्वास यांनी या व्हिडिओत सांगितलं की, शाहजहांनं औरंगजेबाला फारसी भाषेत एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात शाहजहानं हिंदूंचे नाव घेत औरंगजेबाला उपदेश केला होता. कुमार विश्वास यांनी या पत्रातील ओळींचा अनुवाद देखील केला आहे.

ऐ पिसर तू अजब मुसलमानी, ब पिदरे जिंदा आब तरसानी. आफरीन बाद हिंदवान सद बार, मैं देहंद पिदरे मुर्दारावा दायम आब

याचा अर्थ आहे, माझ्या मुला माझ्या मुला, तू एक विचित्र मुस्लिम जन्माला आला आहेस, जो आपल्या जिवंत वडिलांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास देत आहे. आपण ज्या देशावर राज्य करत आहोत, तो माझ्या मुला, मला किंवा तुला समजलेला नाही. एक तू आहेस जो स्वत:च्या जिवंत बापाला पाण्यासाठी त्रास देत आहेत. दुसरिकडं या देशातील लोकं आहे, जे श्राद्धामध्ये पितरांना देखील पाणी देतात.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या छावा चित्रपटाचंही कुमार विश्वास यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर विकी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘आपल्या जीवनातील शौर्याचे मूर्त रूप असलेल्या छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने भारताची अतुलनीय शौर्य परंपरा जिवंत केल्याबद्दल विकी कौशलचे खूप खूप अभिनंदन.’ असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.