Breaking News

गुरुद्वारातील ग्रंथी, मंदिरातील पुजार्‍यांना दर महिना देणार १८००० रुपये; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेत आलो तर ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ सुरू करणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. महिलांना रोख रक्कम देण्याच्या योजनेनंतर आता या नव्या योजनेअंतर्गत हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारामधील ग्रंथींना दर महिना १८,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे.

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा पक्ष सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.

“पुजारी आणि ग्रंथी हे आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, परंतु ते अनेकदा दुर्लक्षित राहिलेले घटक आहेत . देशात प्रथमच आम्ही त्यांना आधार देण्यासाठी एक योजना आणत आहोत, ज्या अंतर्गत त्यांना १८,००० रुपये मासिक भत्ता मिळेल,” असे केजरीवाल म्हणाले आहेत. या योजनेची नोंदणी उद्यापासून सुरू होईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

मंगळवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराला भेट देऊन तेथील पुजार्‍यांच्या नोंदणी प्रक्रियेची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ जाहीर केली. या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दरमहा १००० रुपये दिले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार महिलांची नोंदणीही सुरू करण्यात आली. याशिवाय, दिल्लीत पुन्हा आपचं सरकार आलं, तर हीच रक्कम २१०० पर्यंत वाढवण्याचीही घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. पण आता सरकारच्या याच घोषणेवर दिल्लीच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयानं आक्षेप घेतला असून नोंदणीपासून लांब राहण्याचा सल्ला महिलांना दिला आहे.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे संयोजन आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकीत दमदार उमेदवार अथवा मुद्दे सादर करण्यास अपयश आल्यामुळेच भाजपा अयोग्य मार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *