“पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरि” वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा आणि विठ्ठलचरणी तल्लीन होऊन नाचत गात पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची ओढ या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला असतेच. वारीची ओढ सुरु झाली आहे. स्थानिक प्रशासनापासून तर जिल्हा राज्य शासनाच्या वतीने सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे बैठका सुरु झाल्या आहेत. त्यावेळी मुंबई येथील बैठकीत ‘पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते.
. राज्य शासनाने सोहळ्यातील तीन हजार दिंडयांना २० हजार अनुदानाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत- मतांतरे सुरु झाली आहेत. आक्षेप -प्रति आक्षेप होऊ लागले आहेत. शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देवस्थानांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. तर ‘अखंडपूर्ण वारीची वाट चालणाऱ्या संतांच्या पायिकांनी विरोध दर्शविला आहे. दिंड्याना अनुदान नको, वारी आणि तीर्थक्षेत्रावर सेवासुविधांचे सक्षमीकरण करा, तसेच काही दिंड्या अनुदान मिळतेय ते घ्या अशी संमिश्र भूमिका आणि सूर वारकरी संप्रदायातून उमटत आहे.
अशा आहेत वारकऱ्यांच्या अपेक्षा
१) पालखी मार्ग रुंदीकरण काही भागात अपूर्ण आहे. पालखी तळ जागाचा प्रश्न आहे. जागांचा प्रश्न सोडवायला हवा.
२) वारीमार्गावर आता वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची मोहीम, पर्यावरणाची वारी करण्याची गरज. निर्मलवारी संकल्पनेस बळ द्यायला हवे. वारीकाळात वैद्यकीय सुविधा सक्षम कराव्यात.
३) देहू, पंढरपूर आणि आळंदी या तीर्थ क्षेत्रमध्ये इंद्रायणी आणि चंद्रभागा नदी आहे. तिचे प्रदूषण थांबलेले नाही. प्रदूषण रोखण्याची गरज आहे.