पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचं दिसून येत आहे. त्यातच मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून तब्बल 340 किलो ड्रग्ससाठा जप्त केला आहे. मेफेड्रॉन सदृष्य अंंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विश्रांतवाडी परिसरातून हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या टेम्पोमधून हा ड्रग्स साठा जप्त केला आहे.
पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या तस्करींचं प्रमाण वाढलं असून मोठ्या प्रमाणात छापेमारी केली जात आहे. विविध परिसरात सध्या पोलीस नजर ठेवून आहे. प्रत्येक आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. यातून मिळालेल्या माहितीवरुन विविध परिसरातून माहिती घेऊन पोलीस छापेमारी करत मेफोड्रॉन जप्त करत आहेत.