ईडीने कॅन्सरच्या बनावट औषधांच्या निर्मिती आणि विक्रीत गुंतलेल्या टोळीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईडीने दिल्ली-NCR भागात अनेक ठिकाणी छापे टाकून 65 लाख रुपयांची रोकड जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेने याप्रकरणी अनेक आरोपींना अटक केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने दिल्ली-एनसीआरमधील 10 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी ईडीने आरोपी विफल जैन, सूरज शाट, नीरज चौहान, परवेझ मलिक, कोमल तिवारी, अभिनय आणि तुषार चौहान यांच्या घरावर छापे टाकले.
ईडीने 65 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून त्यात सूरज शाटच्या घरातील एका ठिकाणी लपवलेल्या 23 लाख रुपयांचाही समावेश आहे. यासोबतच संशयितांच्या ताब्यातून इतर मालमत्तेची अनेक कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.
दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरची बनावट औषधं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनेक आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आतापर्यंत 25 कोटी रुपयांची बनावट औषधे विकली आहेत. या टोळीचा आवाका दिल्लीच्या सीमेपलीकडे गेला आणि देशाच्या इतर भागांतच नव्हे तर चीन आणि अमेरिकेतील खरेदीदारांशी त्यांचे संबंध होते.