kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंतप्रधान नरेंद्र मोदी – पत्रकार हेला लेंग प्रकरण : ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स’ चर्चेत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वेचा दौरा तिथल्या एका पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नामुळे सध्या खूप चर्चेत आहे. सोमवारी (18 मे) नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लोमध्ये पत्रकार हेला लेंग यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला की, “पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात मुक्त प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाही?” मात्र, पंतप्रधान मोदी हे उत्तर न देता तिथून निघून गेल्याचे दिसून आलं. या घटनेचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. समाजमाध्यमांवर त्याची चांगलीच चर्चा होत आहे. नॉर्वेच्या पत्रकार हेला लेंग यांनी हा व्हीडिओ पोस्ट करताना ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’चा उल्लेख केला. सोबतच यात नॉर्वे पहिल्या क्रमांकावर तर भारत 157व्या क्रमांकावर असल्याचंही म्हटलं. दरम्यान, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सची देखील चर्चा सुरू झालीये. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे नेमकं काय? हा इंडेक्स कसा आणि कुणाकडून तयार केला जातो? आणि त्यावर भारताचा आक्षेप काय आहे? याबाबत जाणून घेऊया.

रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर (RSF – Reporters Sans Frontieres) ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ना-नफा तत्त्त्वावर काम करणारी पॅरिस स्थित संस्था हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स तयार करते. मोफत आणि खात्रीशीर माहिती मिळणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क असून या हक्काचं संरक्षण आपण करत असल्याचं RSF ची वेबसाईट म्हणते. यासोबतच पत्रकारिता मुक्त, स्वतंत्र, बहुविध असावी हे आपलं ध्येय असून तिचं संरक्षण करणं आपलं उद्दिष्ट असल्याचंही या वेबसाईटवर म्हटलंय. जगभरातल्या 180 देशांमध्ये माध्यमांना किती स्वातंत्र्य आहे हे मोजणारा इंडेक्स RSF कडून दरवर्षी तयार केला जातो.

2026 साठीचा प्रेस फ्रीडम इंडेक्सही प्रसिद्ध करण्यात आलाय आणि गेल्या 25 वर्षांमध्ये जगभरात हा इंडेक्स घसरल्याचं RSF ने म्हटलंय. एखाद्या देशात वृत्त माध्यमांना किती स्वातंत्र्य आहे हे 5 वेगवेगळ्या निकषांवरून ठरवलं जातं. आणि त्यानुसार त्या देशाला ‘व्हेरी सीरियस’ ते ‘गुड’ यामधलं रँकिंग दिलं जातं. 2002 मध्ये पहिल्यांदा हा इंडेक्स तयार करण्यात आला होता. पण 2026 मध्ये पहिल्यांदाच 180 पैकी निम्म्यापेक्षा अधिक – 52.2% देश ‘difficult’ किंवा ‘very serious’ या कॅटेगरीत आले आहेत. 2002 मध्ये हे प्रमाण 13.7% होतं. 2026 च्या प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये पहिल्या 10 क्रमांकावर नॉर्वे, नेदरलँड, एस्टोनिया, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, आयर्लंड, स्वित्झर्लंड, लक्झेम्बर्ग आणि पोर्तुगाल हे देश आहेत. भारत देश या यादीत 2023 साली भारत 161 व्या क्रमांकावर होता तर आता 157 व्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *