ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल तरवडे क्लर्क्स इन येथे झालेल्या कौटुंबिक समारंभात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रा. फ.मु. शिंदे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, निर्माते दिग्दर्शक उदयदादा लाड, प्राध्यापक मिलिंद जोशी, अशोक विखे, गौरव फुटाणे, सुनील महाजन, मोहन जोशी, उमेदवार रवींद्र धंगेकर, रवी चौधरी, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ‘सामना सन्मान’ हा पुरस्कार दिवंगत अभिनेते निळू फुले, श्रीराम लागू, पं. भास्कर चंदावरकर आणि विजय तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणाऱ्या निर्मात्याला हा पुरस्कार दिला जाणार असून साहित्य-कला गौरव या संस्थेची स्थापना करण्याची घोषणा रामदास फुटाणे यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आठवणींना उजाळा दिला. श्रीपाद ब्रह्मे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर स्नेहभोजन होऊन हा कौटुंबिक कार्यक्रम संपला.

‘आज वाढदिवसाच्या निमित्याने आयोजित या कार्यक्रमात शेकडो मित्र व परिचित आले. त्यामुळे आनंद होऊन माझे आयुष्य निश्चितच वाढले असेल’ असे म्हणत रामदास फुटाणे यांनी सर्वांचे आभार मानले.