मुंबई विरूद्ध पंजाबच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटी बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय मिळवला. आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांमध्ये मुंबईवर दबाव आणला खरा पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आशुतोष शर्माची विकेट मुंबईसाठी महत्त्वाची ठरली.

१९व्या षटकात मैदानात सेट झालेल्या हरप्रीत ब्रारनेही आपली विकेट गमावली. हरप्रीत बाद झाल्यानंतर आलेल्या रबाडाने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि पुन्हा एकदा वातावरण बदलले. पण मधवालच्या अखेरच्या षटकात मोहम्मद नबीने चांगली फिल्डींग करत चेंडू इशान किशनकडे पाठवला आणि रबाडा धावबाद झाल्याने पंजाब ऑल आऊट झाला आणि मुंबईने अखेरीस सामना जिंकला.

मुंबईने पंजाबला दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या २ चेंडूवर १० धावा करत पंजाबची चांगली सुरूवात झाली. पण पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंग गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोन मोठे विकेट मिळवले. चौथ्या चेंडूवर बुमराहने रूसोला क्लीन बोल्ड करत एका धावेवर माघारी धाडले तर सॅम करनला इशानकडून झेलबाद करत सामन्याला वेगळे वळण दिले. तर पुढच्याच षटकात कोएत्झीने लिव्हिंगस्टोनला झेलबाद करवत ४ टॉप फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये बाद केले. त्यानंतर हरप्रीत भाटीया आणि शशांक सिंगने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला श्रेयस गोपालने झेलबाद केले. तर उपकर्णधार जितेश शर्माला ९ धावांमध्ये यष्टीचीत केले. पण त्यानंतर पुन्हा एकदा शशांक सिंग आणि आशुतोष शर्माच्या जोडीने कमाल केली.