अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये तेथील मुखिया हाच सर्वांचा पालक असतो , कुटुंब प्रमुख असतो. त्याच्या मुळेच आदिवासी पाड्यांमध्ये कोणी उपेक्षित अथवा अनाथ राहत नाही. हे सुशिक्षित समाजाने समजून घ्यायला हवे. आणि निराधारांना आधार द्यायला हवा . या मूल्याचे शिक्षण समाजात रुजेपर्यंत प्रत्येकाने यादृष्टीने काम केले पाहिजे, असे विचार स्व-रुपवर्धिनीचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन यांनी व्यक्त केले. एच आय व्ही संसर्गित मुलामुलींचे संगोपन आरोग्य व शिक्षण करणाऱ्या ‘मानव्य’ संस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त्य आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘मानव्य’चे अध्यक्ष शिरीष लवाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भूगाव येथील ‘गोकुळ’ या मानव्य संस्थेच्या स्व-वास्तुत हा कार्यक्रम झाला.
‘मानव्य’च्या संस्थापिका कै. विजयाताई लवाटे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शिरीष पटवर्धन पुढे म्हणाले की, ज्यांनी वटवृक्षाप्रमाणे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील दुर्लक्षित अनाथ समजल्या जाणाऱ्या किंवा ज्यांना कोणी जवळ करत नाही अशा मुलामुलींचा सांभाळ करणाऱ्या कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांच्या सारख्या ऋषितुल्य व्यक्ती स्वतःच वटवृक्ष बनतात.त्यांचे आपण प्रत्येकाने आशीर्वाद घेतले पाहिजेत असे ते म्हणाले.
‘मानव्य’चे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ते म्हणाले की, शिक्षण आणि श्रीमंती वाढते तसे समाजातील उपेक्षितांचे सामाजिक प्रश्न संपतात असे मानले जाते. मात्र असे मानणे अयोग्य आहे कारण अमेरिकेसारख्या देशातही शिक्षण व श्रीमंती मोठ्याप्रमाणात असूनही तेथे सामाजिक प्रश्न आहेतच. आपल्याकडेही उपेक्षित निराधारांसाठी सामाजिक कार्य निरंतरपणे चालूच ठेवले पाहिजे पूर्वी मानव्य संस्थेत एच आय व्ही संसर्गित ७५-८० मुले – मुली असायची आता हीच संख्या ३५-४० पर्यंत खाली आली आहे हे चांगले लक्षण आहे मानव्याच्या कार्याचीच ही पावती आहे. दुर्दैवाने समाजात अजुनही अशा उपेक्षितांना सामावून घेतले जात नाही याची खंत वाटते असे ते म्हणाले. ‘मानव्य’च्या या कार्याला आता नवीन प्रकल्पांची देखील जोड देत आहोत असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ‘मानव्य’ मधील विद्यार्थ्यांनी ‘देवास पत्र’ ही नाटिका सादर केली. विद्यार्थी शुभम राजपूत याने स्वतः चितारलेले पेंटीग पाहुण्यांना भेट दिले . संस्थेच्या विश्वस्त जमिला ढलाईत यांनी सूत्रसंचालन केले.. याप्रसंगी सौ. माधवी पटवर्धन ,विश्वस्त सौ .उज्वला लवाटे, विश्वस्त श्री. समीर ढवळे आदि. उपस्थित होते.