Breaking News

लक्ष द्या , टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा !

टाटा समूहातील अत्यंत महत्त्वाची कंपनी असलेल्या टायटन कंपनीचा शेअर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यंदा कंपनीनं तिमाही निकालांसोबतच एका शेअरमागे ११ रुपयांचा लाभांश घोषित केला आहे. जून २७ ही लाभांशाची रेकॉर्ड डेट आहे. त्यामुळं लाभांश पदरात पाडून घेण्यासाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे. टायटन हा दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा फेवरिट स्टॉक होता. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हाच स्टॉक प्रमुख होता. आता रेखा राकेश झुनझुनवाला हा पोर्टफोलिओ पाहतात. मार्चच्या अखेरीस टायटनमध्ये झुनझुनवाला यांची गुंतवणूक ५.३५ टक्के होती. सध्याच्या बाजाराभावानुसार या गुंतवणुकीचं मूल्य १६,१४४ कोटी रुपये होतं.

टायटनवर लक्ष ठेवून असलेल्या ३२ विश्लेषकांपैकी २० जणांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. टायटनच्या अंतिम लाभांशाची रेकॉर्ड डेट २७ जून निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी २६ जून किंवा त्यापूर्वी टायटनचे शेअर्स खरेदी केले आहेत, ते लाभांश देण्यास पात्र असतील. टायटन कंपनीनं तब्बल १३ वर्षांनंतर यावेळी जास्त लाभांश जाहीर केला आहे. २०१० साली कंपनीनं एका शेअरमागे १५ रुपये लाभांश जाहीर केला होता. त्यानंतर आता ११ रुपये देण्यात आले आहेत. मात्र, लाभांश जाहीर झाल्यानंतरही शेअरमध्ये वाढ दिसत नसल्याचं चित्र आहे.

शेअरच्या किंमतीतील वाढ, लाभांशाबरोबरच टायटन कंपनीनं वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. २०१० नंतर कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सही जारी केले आणि १० रुपयांच्या एका शेअरची प्रत्येकी १ रुपयांच्या दहा शेअर्समध्ये विभागणी करून आपल्या शेअरची विभागणी केली.

जून महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये अगदी नगण्य वाढ झाली आहे. तर, मे महिन्यात हा शेअर १० टक्क्यांनी आणि एप्रिलमध्ये ५.५ टक्क्यांनी घसरला होता. २०२४ मध्ये हा शेअर अजूनही ७.३ टक्क्यांनी घसरला आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत हा तोटा भरून काढण्यात यश न आल्यास २०१६ नंतर टायटनचा हा पहिलाच नकारात्मक परतावा ठरू शकतो. असं असूनही टायटनवर लक्ष ठेवून असलेल्या ३२ विश्लेषकांपैकी २० विश्लेषकांनी खरेदीचा, तर इतर आठ जणांनी ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. अवघ्या ४ जणांनी विक्रीची शिफारस केली आहे.