पुण्यात झिका व्हायरस चांगलाच पसरताना दिसत आहे. मुंढव्यात गुरुवारी झिका विषाणूचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर आज त्याच भागात आणखी एक झिका बाधित रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. पुण्यात झिकाबाधित रुग्णांची संख्या ४ झाली आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी सांगितले की, झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
झिकाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र अहवालांची प्रतिक्षा आहे, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, उपचार वेळेत घेतले तर झिका बरा होऊ शकतो. खासगी रुग्णालयांनीही माहिती लपवू नये, असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
रुग्ण आढळलेल्या एरंडवणा आणि मुंढवा परिसरातील २ हजार ४०० हून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या परिसरामधील नागरिकांना झिका व्हायरसची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये झिकाची लक्षणे असलेले रुग्ण आढळले तर त्यांनी याची माहिती न लपवता महापालिकेला कळवावी, असं अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी सांगितलं.
डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडिस डासाच्या चाव्याद्वारे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले रुग्णांमध्ये ताप, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, अंगदुखी आणि सांधेदुखीची सौम्य लक्षणे दिसतात. महापालिकेने शहरातील अनेक भागात कंटेनर सर्व्हे करून तापाच्या रुग्णांची तपासणी सुरू केली आहे.