आज 27 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आज त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा मजकूराची फलके विविध जिल्ह्यांमध्ये लावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. काल 26 जुलैरोजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वाढदिवस होता. या निमित पंकजा मुंडे यांचा ‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’असा उल्लेख केल्याचे अनेक बॅनर बुलढाणा येथे झळकले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर लावण्यात आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचे चेहरा असणार काय?, अशा चर्चा या बॅनरमुळे आता होत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चौकाचौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यातच इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकणाऱ्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “बेशक संघर्ष के हमारे दिन लम्बे हैं, पर हमारे हौसले भी बूलंद हैं…” अशा आशयाचे बॅनर येथे लावण्यात आले आहेत.तसेच सांगली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी असे अनेक बॅनर झळकताना दिसत आहेत. यात उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी हा बॅनर लावला आहे.

तर, दुसरीकडे अकोला येथे बसस्थानक चौकात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे बॅनर अज्ञातांनी फाडले असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे येथे वातावरणही तापलं होतं. दरम्यान, बुलढाण्यातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाण्यातील प्रसिद्ध अशा सैलानी दर्ग्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी चादर चढवली आहे.