समर्पण आयोजित अनुभूती ‘मल्हार राग’ प्रकार या  विषयावरील कार्यशाळा नुकतीच पार पडली. संगीताचार्य पं.डॉ.मोहनकुमार दरेकर यांच्या मार्गदर्शनातून ही कार्यशाळा उत्तम प्रतिसादामध्ये पार पडली.संगीतप्रेमी आणि अभ्यासक यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील बहिरट वाडी येथील अक्षरनंदन प्रशाला सभागृह  येथे ही विनामुल्य कार्यशाळा संपन्न झाली. 

अप्रचलीत मल्हार ,त्यामागील सांगीतिक शास्त्र ,स्वर लगावाने होणारे रागातील बारीक बारीक फरक, या बरोबरच शुद्ध मल्हार,गौड मल्हार रागांच्या बंदिशी या सर्वांविषयी डॉ.दरेकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. डॉ.दरेकर यांनी सांगितले की,‘गुरूला शिकताना समाधान होता कामा नये ,आणि शिकण्याची ओढ आणि अजून शिकावे यासाठीची अस्वस्थता आली पाहिजे शिष्याला! तरच त्याची कला समृध्द होईल’ पुढे ते म्हणाले की,आम्ही अधाशासारख्या मैफली ऐकायचो जेणेकरून स्व-अभ्यास वाढतो ,तसेच शिष्यांनी रागाच्या चार ,पाच स्वररचना या समजून घेतल्या की,अवघड राग देखील आत्मसात करणे सोपे जाते.

अत्यंत नेटके आयोजन आणि समर्पक अशी ही मल्हार कार्यशाळा पं.डॉ.मोहनकुमार दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पं.डॉ.दरेकर यांना तबलासाथ हरी पालवे आणि हार्मोनियमची साथ माधव लिमये यांची लाभली. अनुभूती कार्यशाळेच्या या संधीचा लाभ संगीत क्षेत्रातील प्रत्येकाने घेतला,अनेक मान्यवरांनी या कार्यशाळेस आपली हजेरी लावली.