kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘या’ जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे ८५३ कोटी रुपये ; कृषी मंत्र्याची मोठी घोषणा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये विमा रक्कम येत्या ३१ ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पिक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पिकविमा कंपनीचे अधिकारी , ना. छगन भुजबळ , पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. काल जनसन्मान यात्रा निम्मित नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली असता त्यांनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते.

त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले ८५३ कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित असल्याची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले.

कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले , त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये २१ दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता, त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या पोटी २५ कोटी ८9 लाख मंजूर झाले होते आणि त्याच्या वाटपाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर आज कृषी मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.