पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सहज पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील हे चौथे सुवर्ण पदक आहे. भारतीय खेळाडूने हा सामना २८-२४, २८-२७, २९-२५ अशा सरळ सेटमध्ये जिंकून इतिहास रचला.
हरविंदर सिंग आता पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही नवा विक्रम केला होता. त्यावेळी, पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक (कांस्य) जिंकणारा तो पहिला तिरंदाज ठरला.
पॅरिस पॅरालिम्पिकमधील तिरंदाजीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
हरविंदर सिंग पॅरालिम्पिकच्या इतिहासातील तिसरे पदकही जिंकू शकतो. आता तो पूजा जटायनसह रिकर्व्ह तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत पदकासाठी स्पर्धा करेल. सांघिक स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना आज ५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. जर हरविंदरने त्या स्पर्धेतही सुवर्णपदकाचे लक्ष्य केले तर तो एका पॅरालिम्पिक खेळात २ सुवर्णपदके जिंकणारा इतिहासातील पहिला भारतीय खेळाडू बनेल.