फुलंब्री – फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा ते राजुर या नवीन रस्त्याचे काम झाल्याने चार ते पाच फूट रस्ता जमिनीपासून उंच आहे. पिंपळगाव परिसरात सदरील पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे 40 एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यात मका, ऊस, कपाशी, मूग व अद्रक आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील गेल्या दोन महिन्यापासून पिकात हे पाणी साचलेले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा ते राजुर या नवीन रस्त्याचे काम नव्याने करण्यात आले आहे. शेत जमिनीपासून सुमारे पाच फुटापर्यंत हा रस्ता उंच असल्याने मोठ्या प्रमाणात ठीकठिकाणी पाणी साचलेले आहे. सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर पाणी साचल्याने संबंधित शेतकऱ्याने तहसील प्रशासनाला निवेदन दिले. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. मात्र मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सदरील पाणी शेतात तुंबलेले आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने सुमारे 40 – 50 एकर क्षेत्रात हे पाणी सध्या साचलेले आहे. परिणामी खरीपातील मका पाण्यात आडवी झाली, तर कपाशी व मकाचे पिक वाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संबंधित शेतकरी शासकीय दरबारात वारंवार निवेदन देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्याने हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने मध्यस्थी करून सदरील शेतकऱ्यांच्या शेतात तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे
कचरू थोरात (0.71 आर), संतोष थोरात (1.11 आर), किसन जाधव (0.60 आर), आजिनाथ थोरात (0.80 आर), दिगंबर काकडे (0.40आर), त्रिंबक थोरात (0. 08आर), नाना थोरात (0.08 आर), संजय गायके (0.20 आर), दादाराव गायके (0.20 आर), सुधाकर गायके (0.20आर), रवी गायके (0.20आर), लक्ष्मण काकडे (0.40 आर), शशिकलाबाई थोरात (0.40आर), रावजी गायके यांच्यासह आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव येथे रस्त्याची उंची वाढल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले आहे. सदरील पाण्याचा निचरा होत नसल्याने खरिपातील पिके वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याने शेतकरी हातबल झाले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. सदरील पिकाची पाहणी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. मात्र पालकमंत्र्याच्या पाहणीनंतरही कुठलीही उपाययोजना प्रशासनाने केली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भरोसा ठेवायचा कुणावर असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार, तत्कालीन आमदार तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर, माजी जि. प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे आदींनी पाहणी करून प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र अजूनही यावर उपाययोजना झाली नसल्याने शेतकऱ्याचे खरीपातील पिके दोन महिन्यापासून पाण्यात आहे.