ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा कुणी महात्मा नाही. त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी पण त्याला ही शिक्षा होत असताना कायद्याची प्रक्रिया पाळली गेली पाहिजे. या देशाचा शत्रू असणाऱ्या कसाबला फाशी देताना सुद्धा कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पाळली गेली होती. तीच प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात पार पडायला हवी होती. अक्षय शिंदेचा झालेला हा एन्काउंटर ही एका अर्थाने बदलापूर प्रकरणातील सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय.”

सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले हे प्रश्न :

हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या चार जणांचा एन्कांऊटर झाला, त्या प्रकरणात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वापरली गेली, तीच स्क्रिप्ट या प्रकरणात वापरली गेली आहे हे फार उल्लेखनीय आहे.

अक्षय शिंदे जर एवढा हिंस्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याची नेआण करताना पोलिसांनी पुरेशी काळजी का घेतली नाही?

अक्षय शिंदेच्या दोन्ही हातात बेड्या असताना त्याने पोलिसांच्या कमरेची बंदूक काढून पोलिसांवर गोळीबार करणं त्याला शक्य आहे का?

अक्षय शिंदेकडून पोलिसांच्या पायावर गोळी लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते आणि त्यात त्याचा जीव जातो. हे असं कसं घडलं?

पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपासयंत्रणा जी राबवली जात होती, ती संशयास्पद होती. पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता. बदलापूर प्रकरणातील शाळेशी संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. त्याला अटक का केली गेली नाही?

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, “या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाहीत. सबब या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे पोलीस कर्मचारी तात्काळ निलंबित व्हायला हवेत. या प्रकरणातील संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आतातरी सत्तेचा मोह सोडून, कायद्याची चाड राखून देवेन्द्रजी तुम्ही राजीनामा देणार आहात का?”